मोकाट गुरांच्या कारवाईबाबत सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाकडून तात्काळ दखल

ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासनाला गुरे मालकांची माहिती पाठविण्याचे आवाहन

राजापूर | प्रतिनिधी: मुंबई गोवा महार्गावर राजापूर तालुक्यात वाटूळ पासून ते पुढे हातिवले टोलनाका ते पन्हळे टाकेवाडी खारेपाटण पर्यंत मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी रिक्षा संघटना पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, वाहन चालक, व लोकप्रतिनिधी यांनी छेडलेल्या आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने तात्काळ दखल घेतली आहे. यासाठी कार्यकारी अभियंता यांनी महामार्गालत असलेल्या ग्रामपंचायत व राजापूर नगर परिषदेला तात्काळ लेखी पत्र देत अशा प्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या गुरे मालकांची माहिती पोलीसांकडे द्यावी असे आवाहन केले आहे.

सोमवारी ८ सप्टेंबर रोजी हातिवले, कोंड्ये तर्फ सौंदळ, दोनिवडे, कोदवली येथील सरपंच व ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील, रिक्षा चालक संघटना कोंड्ये तर्फ सौंदळ व हातिवले यांनी हातिवले टोल प्लाझा येथे एकत्र जमुन पोलीस प्रशासनाला महामार्गावर येणा-या व बसुन राहणा-या मोकाट जनावरे व त्यामुळे होणा-या अपघातांना आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, असे निवेदन दिलेले आहे. सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने राजापुर पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हा नोंदविण्याची तत्परता दर्शविलेली असुन सदरचे गुन्हे नोंदविताना आपल्या कार्यकक्षेतुन जाणा-या महामार्गाच्या लांबीत आढळणा-या मोकाट जनावरांच्या मालकांचा तपशील व दोन पंच देण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना विनंती केलेली आहे. राजापूर नगर परिषदेसह ग्रामपंचायत वाटुळ, मंदरुळ, कोंडीवळे ओणी, खरवते, नेरकेवाडी, तरळवाडी, कोदवली कोंडेड, उन्हाळे, गोठणे-दोनविडे, हातिवले, कोंड्ये बाजूला सौंदळ, पन्हाळे बाजूला सौंदळ, तळगाव या ग्रामपंचायतींना असे पत्र देण्यात आले आहे.

महामार्गावरील मोकाट जनावरांना धडकून होणारे अपघात टाळण्यासाठी वरीलप्रमाणेची माहिती पोलीस प्रशासनाला तत्परतेने देण्यात यावी व पोलीस प्रशासन व महामार्ग प्राधिकरण यांना सहकार्य करावे असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.