लांजाचा सुपुत्र साहिल सरफरे भारतीय वायुसेनेत मेडिकल असिस्टंट’ पदावर नियुक्त 

प्रचंड मेहनत, जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी, लांजा वासियांसाठी अभिमानास्पद बाब 

लांजा | संतोष कोत्रे

ध्येय साध्य करण्यासाठी असलेली चिकाटी, प्रचंड मेहनत आणि जिद्द या त्रिसूत्रीच्या बळावर लांजा

शहरातील आगरवाडीचा सुपुत्र साहिल सुरेश सरफरे हा भारतीय वायुसेनेत दाखल झाला आहे.‌कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ’मेडिकल असिस्टंट’ या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. साहिलने जिद्दीने मनाला गवसणी घालताना आजच्या तरुणाईला एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

साहिलचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण लांजा येथील कै. एकनाथ राणे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले, तर अकरावी व बारावी लांजा हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेतून पूर्ण केले. गतवर्षी त्याने भारतीय वायुसेनेच्या भरती परीक्षेत सहभाग घेतला आणि संपूर्ण भारतामध्ये पंधरावी रँक मिळवून उत्तीर्ण झाला होता.

साहिलने आपले १४ महिन्याचे प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केले – बेंगलोर, गोरखपूर (उत्तरप्रदेश) आणि पुन्हा बेंगलोर. यानंतर आता त्याची पोस्टिंग पंजाब पाकिस्तान बॉर्डरवर करण्यात आली असून, देशरक्षणाच्या कार्यात योगदान देण्यासाठी लवकरच तो रुजु होणार आहे.

नुकत्याच झालेल्या बेंगलोर येथे पासिंग आऊट परेडमध्ये त्याने यशस्वी सहभाग नोंदवला. या बॅच मध्ये एकूण ११८ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

पासिंग आऊट परेड सोहळ्यासाठी साहिलचे आई, वडील आणि बहीण सुद्धा बेंगलोरमध्ये उपस्थित होते, ज्यामुळे हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे.

शालेय जीवनापासूनच साहिलला क्रीडा क्षेत्राची आवड होती. तो कबड्डी खेळाचा उत्कृष्ट खेळाडू असून, लांजा आगरवाडी संघातून त्याने चमकदार कामगिरी केली आहे. मेहनत, शिस्त, चिकाटी आणि संघभावना यामुळे हाच खेळ त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला असे साहिलने बोलताना सांगितले.