सावर्डेत दोन महिन्यापूर्वी केलेल्या मलमपट्टीवर पुन्हा खड्डा !

चिपळूण चा उड्डाणंपूल अर्धवटचं!

गौरव पोंक्षे माखजन:
मुंबई गोवा महामार्गांवर अर्थात पनवेल कन्याकुमारी दृतगती महामार्गांवर प्रत्यक्ष लोकार्पणापूर्वी खड्यांची मालिका च. सुरु झाली आहे.दोन महिन्यापूर्वी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या नजीक थोड गोव्याच्या दिशेला दोन्ही बाजूला खड्डे बुजवण्यात आले होते.परंतु अगदी दोन महिन्यातच गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर नव्याने केलेल्या कामावरच खड्डा पडला आहे.रस्त्यातील शिग बाहेर आली आहे.
निव्वळ असे निकृष्ठ काम करून वाहन चालकांच्या व नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम सुरु आहे.या गोष्टीकडे ना अधिकारी लक्ष देत ना लोकप्रतिनिधी.या रस्त्याच्या लोकार्पणा पूर्वीच खड्डे पडतात,ते खड्डे पुन्हा खर्च करून ठराविक रस्ता फोडून,काँकरिट च्या सहाय्याने बुजवले जातात,आणि पुन्हा त्याचं ठिकाणी खड्डा पडतो,याला काय म्हणावं?कामाचा दर्जा विषयी प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान या रस्त्याला भेगा गेल्या आहेत,अनेक ठिकाणी अक्षरशः रस्ता खडबडीत झाला आहे.काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.हे सारे येथील जनतेला सोसावे लागत आहे.
पनवेल ते कन्याकुमारी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे वारंवार बोलले जाते.पण नेमका हा रस्ता अधिकृत केव्हा पूर्ण होणार हे अनुत्तरितच आहे.मंत्र्यांची पोकळ आश्वासने आणि कुर्मगती ने सुरु असलेले काम यामुळे नागरिक व वाहन चालक पुरते कंटाळले आहेत.चिपळूणातील उड्डाणं पुलाचे काम गणपती पूर्वी पूर्ण होणार होते.परंतु गणपती विसर्जनाला दोन महिने झाले तरी चिपळूणातील उड्डाणं पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे.चिपळूणातील उड्डाणंपूल सुरु झाल्यापासून उड्डाणंपूळाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली नेहमीच पाहायला मिळते,सुरु असलेल्या कामामुळे धुळीचा त्रास,शहर असल्याने सर्व्हिस रोड वरती सहाजिकच गतिरोधक आहेत.या गतिरोधकामुळे मोठमोठाले कंटेनर सतत आपटत असतात.याचा आवाज शहरातील रहिवाशांना रात्रंदिवस सोसावा लागत आहे.आज ना उद्या उड्डाणंपूल सुरु होईल या आशेवर दिवस ढकळणाऱ्या चिपळूणातील रहिवाशांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे.शाळकरी मुले,सायकलस्वार,पादचारी या मार्गांवरून ये जा करत असतात.सर्व्हिस रोड वरून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची वाहने असल्याने अनेक अपघात झालेले चिपळूणकरानी अनुभवले आहेत.त्यामुळे या उड्डाणंपूलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर,या रस्त्याचे ट्राफिक वाढणार असेही बोलले जाते.पनवेल हून दक्षिणेत जाणारी वाहने आहेत, ती कोल्हापूर मार्गे न जाता गोवा मार्गे कमी अंतर होत असल्याने या मार्गे जातील असा अंदाज आहे.त्यामुळे साहाजिकच या रस्त्यावतरील वाहतूक वाढू शकते.परंतु या सगळ्या आधीच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रस्त्याचा पृष्ठभाग कुठेच सपाट नाही.त्यामुळे वाहन देखील उथळ गचके देत पुढे जाते.या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार शासन करणार का असा सवाल उपस्थित.केला जात आहे.
चिपळूण चा उड्डाणंपूल तात्काळ पूर्ण करा,आणि संगमेश्वर ते चिपळूण रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवा अशी मागणी होत आहे.