दापोलीच्या सिद्धेश गोलांबडेची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

दापोली – (प्रतिनिधी)

दापोली तालुक्यातील कोंढे गावचा सिद्धेश प्रदीप गोलांबडे याची १७ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मथुरा (उत्तर प्रदेश) येथे पार पडणार आहे.
अलीकडेच अकलूज (सोलापूर) येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश गोलांबडे याने उत्कृष्ट खेळ करत चमक दाखवली. त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. या स्पर्धेदरम्यान त्याने एका सामन्यात सामनावीर चषकही पटकावला.
सिद्धेश सध्या दापोलीतील वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूल व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे जुनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वर्गशिक्षक हेमराज महांदु महाले यांनी त्याला आर्थिक सहकार्य करून प्रोत्साहन दिले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिद्धेशच्या यशामागे टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित अनेराव, जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, टेक्निकल डायरेक्टर रोशन किरडवकर, मुख्य प्रशिक्षक मनोज पकये, पियुष पवार आणि साहिल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तांत्रिक सल्लागार प्रथमेश डांगे, शैक्षणिक सल्लागार सुशांत राईन सर, रमाकांत कांबळे, सागर भारती, भावेश लोंढे, सुनील मोर्ये आणि गणेश खानविलकर यांनी सिद्धेशचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.