दोडामार्ग l प्रतिनिधी : साटेली भेडशी येथील खालच्या बाजारात अवैधरित्या मटका घेणाऱ्या एका व्यक्तीवर छापा टाकून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी याबाबतची फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, अनिकेत बाबू खरवत (वय २४, रा. झरेबांबर, काजूवाडी) हा सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळवत असताना रंगेहाथ पकडला गेला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून २ हजार ७५० रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. दोडामार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई करत आहेत.











