हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हे आजच्या तरूण पिढीमध्ये रूजविले पाहीजे-शरद पोंक्षे

राजापूर नगर वाचनालयात 'स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन' या विषयावर व्याख्यान देताना शरद पोंक्षे तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित जनसमुदाय.

राजापूर (वार्ताहर) : जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव हिंदुचा देश आहे. हिंदु बहुसंख्य राहिले तरच या देशात सर्वधर्म समभाव टिकेल अन्यथा नाही. जगाला जोडण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात असून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हे आजच्या तरूण पिढीमध्ये रूजविले पाहीजे. जाती पाती आणि वाईट चाली रिती संपवल्या पाहिजे. हिंदु सारा एक झाला तरच खऱ्या अर्थाने देश टिकेल. भारत देश समृध्द व्हायचा असेल तर संस्कृत ही देशाची राष्ट्रीय भाषा असली पाहिजे आणि गुरूकुल पध्दतीची शिक्षण व्यवस्था पुन्हा निर्माण केली पाहिजे असे परखड मत अभिनेते आणि स्वा. सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

येथिल नगर वाचनालय राजापूरच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नगर वाचनालय सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राचे अनेक पैलु उलगडले. सुमारे दोन तास त्यांनी सावरकर विचारांचे स्फुलिंग उपस्थितांमध्ये चेतविले.
ते म्हणाले, भारत विकसीत राष्ट्र कधीच व्हायला हवे होते. मात्र ते झालं नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर सावरकरांच्या विचारांना तिळांजली दिली गेली. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार, सावरकरांचा भारतीय तरूणांना सैनिकीकरणाचा विचार, भारतातील लोकशाही कशा पध्दतीने प्रस्थापित केली पाहिजे याच्या पाठिमागचा विचार सर्व जातीच्या भिंती संपून एक एकजुट समाज म्हणून भारत कसा उभा राहील याबद्दल सावरकरांनी जे विचार मांडले ते सगळे विचार साठ वर्षे काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर त्या विचारांना कचऱ्याची टोपली दाखविली गेली. देशही रसातळाला निघुन गेला. जो पर्यंत हिंदू समाज एक होत नाही तोपर्यंत बहुसंख्याकांचा विचार कोणी करणार नाही. यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील आघात रोखण्‍यासाठी सिद्ध व्‍हायला हवे असेही ते म्‍हणाले.

स्वा. सावरकरांनी जातीच्या भिंती मोडल्या परंतु हिंदु एक जातीचा झाला तरच काही साध्य करता येईल. आमचं राजकारण कसं चालेल ही भिती काँग्रेसला होती त्यामुळे सावरकर जावून साठ वर्षे झाली तरी राहुल गांधीच्या स्वप्नात सावरकर येतात अशी टिका त्यांनी केली.

एक वेळ मायभूमीसाठी सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी विसरलात तरी चालेल परंतु १९२४ ते १9३७ हा कालखंड विसरू नका. या तेरा वर्षात सावरकरांनी जात निर्मलनाचे केलेले काम कधीही विसरू नका. हिंदु समाज एक व्हावा म्हणून त्यानी घेतलेले कष्ट घेतले. रत्नागिरीमध्ये पतीतपावन मंदिर आणि पाचशे विहीरी अस्पृशांसाठी खुल्या केल्या. हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. जे देशाचा इतिहास विसरात त्या देशाचा भुगोल बिघडतो. त्यामुळे आपण सर्वांनी खरा इतिहास वाचला पाहिजे आणि तो पुढील पिढीला सांगितला पाहिजे.

छत्रपती शिवरायांना गुरुस्‍थानी मानून स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी युद्धनीती आणि राजकीय मुत्‍सद्देगिरी अवलंबली होती. यावेळी चातुवर्ण, स्वातंत्र्यपुर्व काळातील हिंदु समाजाची स्थिती, स्वातंत्र्यानंतरची स्थिती, सावरकरांचे कार्य आणि त्‍यांचे विविध पैलू श्री. पोंक्षे यांनी उलगडले. दयेचा अर्ज आणि माफीनामा यांवरून होणाऱ्या आरोपाबाबत श्री. पोंक्षे यांनी त्‍यावेळची वस्‍तूस्‍थिती मांडली. हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील आघात रोखण्‍यासाठी सिद्ध व्‍हायला हवे. हिंदुस्‍थानात रहायचे असेल, तर हिंदु राष्‍ट्राचे कायदे पाळावेच लागतील. तर जो हिंदु हिताचा विचार करेल त्यालाच मतदान केले पाहिजे असेही ते म्‍हणाले.

प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी केले. तर श्री. पोंक्षे यांचा वाचनालयाचे वतीने अध्यक्ष प्रभात पाध्ये यांनी सत्कार केला. सुत्रसंचालन ग्रंथपाल सौ. पद्मजा कारेकर यांनी केले तर आभार लोचणी साळवी यांनी मानले. यावेळी सावरकरप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सौ. संजीवनी मालपेकर यांच्या संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.