देवधे शेती शाळेसमोरील जंगलमय भागातील घटना
लांजा (प्रतिनिधी) : झाडाझुडपाच्या आडोशाला बसून बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या ३५ वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेचा समोरील जंगलमय भागात घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीजीत यशवंत कांबळे (वय ३५ राहणार देवधे बौद्धवाडी) हा दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेच्या समोरील जंगलमय भागात जंगली झाडाझुडपाच्या आडोशाला गांजासदृश्य अमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला होता. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कदम यांनी दिली होती.
याप्रकरणी ऋषीजीत कांबळे याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट १९८५ चे कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.












