लांजा तालुक्यातून संजय यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
लांजा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी लांजा येथील भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी असलेल्या संजय यादव यांची निवड झाली आहे.
संजय यादव हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कट्टर राणे समर्थक अशी त्यांची ओळख असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने ते पक्ष संघटना वाढ आणि पक्षाची ध्येय धोरणे राबवण्यावर नेहमीच प्रयत्नशील असतात.
यापूर्वी लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच भाजपाचे गटनेता म्हणून ते कार्यरत होते.ही गटनेता पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भाजपा युवा मोर्चाच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर जिल्हा चिटणीस पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली होती. या सर्व जबाबदाऱ्या संजय यादव यांनी यशस्वीपणे सांभाळताना त्या त्या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांच्या या एकूणच पक्षनिष्ठा आणि कार्यकर्तृत्वाची दखल घेत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी संजय यादव यांची भाजपाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे .
जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय यादव यांनी संपर्क मंत्री तसा राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी देखील त्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल संजय यादव यांनी भाजपाचे सर्व जिल्हा पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले आहेत.
दरम्यान निष्ठावान कार्यकर्त्याला दिलेल्या या महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल संजय यादव यांचे लांजा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. तर पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळून पक्ष संघटना वाढ आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे संजय यादव यांनी सांगितले.












