लाच स्वीकारताना तीन सरकारी कर्मचारी जाळ्यात
स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा समावेश
रत्नागिरी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रत्नागिरीमध्ये एका धडक कारवाईत तीन सरकारी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. यात स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक, एक शिपाई आणि जिल्हा परिषदेतील एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचा समावेश आहे. एका कामासाठी 16,500 रुपयांची लाच स्वीकारताना हे अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले.
या कारवाईतील तक्रारदार हे दापोली येथील पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत करण्यात आले होते. या लेखापरीक्षण अहवालातील 21 प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, हे मुद्दे वगळून अंतिम अहवाल (FR) देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. सुरुवातीला 24,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती, परंतु तडजोडीनंतर 16,500 रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने 11 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची सत्यता पडताळली आणि तात्काळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, 11 सप्टेंबर रोजी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना तिन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. कंत्राटी शिपाई सतेज घवाळी याने ही लाच स्वीकारली आणि ती सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे दिली. त्याचवेळी, एसीबीच्या पथकाने तिघांनाही अटक केली.
शरद रघुनाथ जाधव, वय 53, सहाय्यक संचालक (वर्ग-1), स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी
सतेज शांताराम घवाळी, वय 38, शिपाई (कंत्राटी), स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी
सिद्धार्थ विजय शेट्ये, वय 45, सहाय्यक लेखा अधिकारी (वर्ग-3), वित्त विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी
या तिन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, कलम 7 (अ) आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे रत्नागिरीतील शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या नेतृत्वाखालील एसीबीचे पथक करत आहे. एसीबीने रत्नागिरीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली जात असेल तर त्यांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. नागरिक टोल फ्री क्रमांक 1064 वर किंवा एसीबीच्या रत्नागिरी कार्यालयाच्या 02352-222893 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.












