राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कळसुलकर हायस्कूलच्या सार्जंट अनंत चिंचकरने पटकावले सुवर्णपदक

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा इयत्ता नववीतील विद्यार्थी अनंत अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील ‘स्नॅप शूटिंग’ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याचा आणि शाळेचा गौरव वाढवला आहे. 58 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, सिंधुदुर्गचा छात्र सैनिक असलेल्या अनंतची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्थळ सैनिक कॅम्पसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत देशभरातील जवळपास 800 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

या शिबिरामध्ये अनंतने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती अशा विविध ठिकाणी झालेल्या सराव शिबिरांतही आपले कौशल्य सिद्ध केले होते. अखेर सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये त्याने ‘स्नॅप शूटिंग’ या प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सार्जंट अनंतला 58 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज डी मंडलिक आणि प्रशालेचे एनसीसी विभाग प्रमुख तथा फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे मार्गदर्शन लाभले. अनंतच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री एस.व्ही. भुरे, पर्यवेक्षक श्री एस.एस. वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि हितचिंतकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.