खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) मोरवंडे बोरज येथे हिंदी दिन मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे यांनी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून केली. त्यानंतर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी बालगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. महेश चिले यांनी उत्साही पद्धतीने पार पाडले.
या प्रसंगी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. संस्कृती निर्मळ यांनी आपल्या मनोगतामधून हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे तिच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर आहे, यावर विशेष भर दिला.या कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक श्री. अभिजीत मनवे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
हिंदी दिनाच्या या उत्सवाचे यशस्वी आयोजन प्राचार्य मा. श्री. भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.












