महाराष्ट्र, दिल्लीसह गोवा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदि राज्यांमध्ये ज्या मराठी चित्रपटाचा तुफान डंका वाजतोय, त्या ‘दशावतार’ या ब्लाॅकबस्टर चित्रपटातील कलावंतांना गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
दशावतार हा लोककलाप्रकार जितका महाराष्ट्राच्या कोकण प्रांतांत लोकप्रिय आहे तितकाच तो गोव्याच्या भूमीतही विशेष प्रसिद्ध आहे. गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेत दशावतारचे खेळ आजही आपली मोहोर उमटवत आहेत. त्यामुळेच ‘दशावतार’ हा चित्रपट महाराष्ट्राइतकाच गोव्यातील रसिकांनीही डोक्यावर घेतला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मित आणि नव्या दमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटाने भव्यतेचे एक नवे समीकरण मांडले आहे.
कोकणातील कलासंस्कृती, तिथल्या रूढी – परंपरा या थोड्या अधिक फरकाने गोव्याशी साधर्म्य साधणार्या असल्याने ‘दशावतार’ चित्रपटाने गोंयकरांचीही मने जिंकली आहेत. गोव्यात तुफान गर्दीत सुरू असलेल्या या चित्रपटाच्या कलावंताचे कौतुक करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कलावंतांना गोव्यात खास निमंत्रित केले आहे. गोव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी पणजी येथे ‘दशावतार ‘ चा खास शो आयोजित करण्यात आला आहे.
मालिका, नाटक , ओटीटी आणि चित्रपट या सर्वच माध्यमात नेहमीच आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ‘दशावतार ‘ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या अभिनयाची जादू रसिकांना पुन्हा एकदा या चित्रपटात अनुभवता येत आहे. तर महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे , सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर अशा अनेक दमदार कलाकारांच्या या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. कोकण, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या लाल मातीतील ‘दशावतार‘ आता भारतभरातच नाही तर जगभरात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा झंझावाती प्रतिसाद मिळत असून लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत, मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांमध्येही उदंड लोकप्रियता ‘दशावतार ‘ चित्रपट मिळवत आहे. हा चित्रपट मराठी भाषेत बनलेला असला तरी त्याचा विषय सार्वत्रिक आहे. म्हणूनच तो कुठल्याही भाषेपुरता, प्रांतापुरता मर्यादित नसून त्याची भाषा ही चित्रभाषा आहे . आणि त्यामुळेच भाषा आणि प्रांताची चौकट मोडून तो जगभरातील रसिकांना भिडतो आहे.
दशावतार ‘ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.













