सख्ख्या मुलांनीच केला वडिलांचा खून!
दारूच्या व्यसनातून वडिलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कृत्य!
आरोंद्यातून दोघांना ताब्यात घेत एलसीबीने उघड केला खुनाचा गुन्हा
कणकवली : वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील जंगलमय परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल दहा दिवसांच्या तपासानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह खुनातील आरोपींचाही छडा लावण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, पित्याची हत्या करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचेच दोन मुलगे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत आणि मारहाण करीत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमताने वडिलांचा खून केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणातील एका प्रौढ आरोपीला अटक करण्यात आली असून अल्पवयीन भावालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रेडी येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आणि मृत्यू संशयास्पद असल्याने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ४७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांनी तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेज तपासणी, तांत्रिक विश्लेषण, स्थानिक पातळीवरील चौकशी आणि मानवी कौशल्याच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली. अनेक दिवसांच्या अथक तपासानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.०८ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक माहिती, रेल्वे प्रशासनाकडून मिळविलेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. मयताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या हालचालींची माहिती मिळविण्यात आली. तसेच नातेवाईकांची माहिती घेतल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. वृंदावन टोला, नरदरवा, सितालपूर, पूर्व चंपारण, बिहार) असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान मयताचे दोन मुलगेच या खुनामागे असल्याचे स्पष्ट झाले. नजरे दाऊद आलम (वय ३१) आणि त्याचा अल्पवयीन लहान भाऊ, दोघेही मूळ रा. वृंदावन टोला, नरदरवा, सितालपूर, पूर्व चंपारण, बिहार व सध्या रा. आरोंदा, रेडकरवाडी, ता. सावंतवाडी, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथे सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता मृत व्यक्ती आपले वडील असल्याचे त्यांनी सांगितले. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत असत तसेच मारहाण करीत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमताने वडिलांचा खून केला. त्यानंतर गुन्हा उघडकीस येऊ नये आणि मृतदेहाची ओळख पटू नये, या उद्देशाने मृतदेह रेडी येथील जंगलमय परिसरात नेऊन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील प्रौढ आरोपी नजरे दाऊद आलम याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दुसरा आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्याच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ, श्री. हनुमंत भोसले, श्री. सुधीर सावंत, पोलीस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, सुरेश राठोड, प्रकाश कदम, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालविस, अविनाश ओटवणेकर, अमर कांडर, महेश्वर समजिसकर यांनी सहभाग घेतला.
तसेच सायबर पोलीस ठाण्याचे फ्रिडम बुथेलो व धनश्री परब, एटीबीचे पोलीस अंमलदार योगेश साटम, एसडीपीओ कार्यालय सावंतवाडी येथील पोलीस अंमलदार सिद्धार्थ प्रभूतेंडोलकर आणि सीसीटीएनएसचे अंमलदार ऋषिकेश टोपले यांनीही या तपासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले.













