▪️श्री सरस्वती साईश्वरी संस्थेचा स्तुत्य सामाजिक उपक्रम!
मसुरे | झुंजार पेडणेकर
गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या मुंबई येथील श्री सरस्वती साईश्वरी संस्था, कांजूरमार्ग पूर्व यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे कातकरी समाजातील गरजू कुटुंबांसाठी विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना दीपावलीचा फराळ, कपडे, खेळणी, लहान बाळांसाठी पाळणे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर गरजू कुटुंबांनाही दीपावलीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी मोलाची मदत मिळाली.
या सामाजिक उपक्रमास सहप्रायोजक म्हणून कै. श्रीमती सुहासिनी सुदाम मणचेकर यांच्या स्मरणार्थ प्रणव प्रमोद मणचेकर, प्रवरा प्रमोद मणचेकर आणि सौ. प्रज्ञा प्रमोद मणचेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी लोकेश जैन, नरेश कोर्लेकर आणि निवृत्ती गोगावले व सुरज बांदकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा संस्थेच्या कार्यामागील मुख्य उद्देश आहे.
सेवेचा आनंद, माणुसकीचा सन्मान आणि गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य हेच संस्थेच्या सामाजिक कार्याचे खरे समाधान आहे असे सूरज बांदकर म्हणाले.













