दोडामार्ग येथील दीपक बुगडे यांना गोवा येथे ‘हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थे’चा पुरस्कार प्रदान

मान्यवरांची उपस्थिती

दोडामार्ग: प्रतिनिधी

 

दोडामार्ग शहराचे रहिवासी दीपक बुगडे यांना ‘हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड’ आणि ‘श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, समर्थ गड, मडगाव, गोवा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष दामोदर गजानन नाईक आणि उद्घाटक म्हणून आमदार श्री. उल्हास तुयेकर उपस्थित होते. या सोबतच ह.भ.प. दादा महाराज गुरव (गोरेगाव, सातारा), श्री श्रीकांत झिपरे (पालखी संयोजक, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र, अक्कलकोट), व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात पुणे, सातारा, मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कराड, आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या 25 पुरस्कार्त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये संगीत, नाटक, पत्रकारिता, वकिली आणि समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता. दोडामार्ग येथून अंजली बुगडे, स्वामिनी बुगडे, माजी नगरसेवक दिवाकर गवस, सागर मावळणकर, प्रसाद बोर्डीकर, बाबुराव ठाकूर, अक्षय गावडे, उदयोजक प्रणय मोरजकर, प्रणिता मोरजकर, नाना चांदेकर, सुभाष कासार, आणि संजय शिरोडकर यांसारखे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.