“प्रशासनाचा आरसा ठरला सेवा पंधरवडा – हजारो कुटुंबांना दिलासा”
मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी : बाळ खडपकर
सिंधुर्गातील सेवा पंधरवड्याचे उद्घाटन हे केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता जनतेच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी फुलवणारा उत्सव ठरला. महिला स्वयंसहायता गटांना निधी, कातकरी समाजासह गरजू कुटुंबांना घरकुलांच्या चाव्या, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले तर आरोग्य सेविकांना नियुक्तीपत्रे अशा बहुविध उपक्रमांतून प्रशासनाने खऱ्या अर्थाने “सेवेतून सुखाचा उजेड” जनतेच्या घराघरात पोहोचवला. हा पंधरवडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वर्षभरातील ३६५ दिवसासाठी आरसा असेल, असेच काम वर्षभरात व्हावे व आपल्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहेत व आपल्याला मिळाली खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे असे काम करावे अशी अपेक्षा सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
देशवासीयांसाठी अविरत काम करणारे, सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले विश्व नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असा राज्य शासनाने जाहीर केलेला सेवा पंधरावडा कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी सिंधुदुर्ग नगरी येथे झाले. या अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ५५४ महिला स्वयंसहायता समूहांना ३ कोटी ३२ लक्ष ४० हजार निधीचे वितरण, सर्वांसाठी घरे या योजनेतील कातकरी समाजाला घरकुल चावी वितरण, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतील रमाई आवास योजनेतील घरकुलांची चावी वितरणाचा कार्यक्रम बुधवारी सेवा पंधरावाड्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने यावेळी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी शाळा तिथे दाखला हा नाविन्यपूर्ण व आदर्श उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला जात व वय अधिवास दाखला देण्याचे त्यांनी नियोजन हाती घेतले आहे. एकही विद्यार्थी या दाखल्यापासून वंचित राहू नये यासाठी या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण काम सुरू झाले आहे. याबद्दल आपण सर्व अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक करतो. हा सेवा पंधरवडा प्रशासनासाठी एक आरसा आहे. या पंधरा दिवसात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो, दाखले वितरण करतो, घरकुलाचे वितरण करतो, नियुक्तीपत्रे देतो असेच काम वर्षातील ३६५ दिवसात अधिकारी कर्मचाऱ्यांनी करायला हवे! माझ्यासह सर्व शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक म्हणून काम करू व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू.
सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पूर्ण झालेल्या घरकुलांच्या चाव्या वितरणाचा कार्यक्रम, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण, आरोग्य सेविकांना नियुक्तीपत्रे, महिला स्वयंसहायता गटांना निधीचे वितरण असे विविध कार्यक्रम सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून गेले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आधी उपस्थित होते.
शाळा तेथे दाखला असा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील कोणताही विद्यार्थी दाखल्यापासून वंचित राहणार नाही अशी दक्षता प्रशासन घेणार आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विद्यार्थ्या आपले सरकार सेवा केंद्र मार्फत प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत दाखले देण्याचा हा उपक्रम आहे. राज्यातील दोन जिल्ह्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या या अभियानात हा जिल्हा राज्यात अग्रेसर राहील असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
“इच्छाशक्तीची जिद्द फळाला – सिंधुदुर्गातील ८९ आरोग्य सेविकांना दिला न्याय!
“सेवेसाठी सज्ज चेहऱ्यावर फुलला आनंद”
सिंधुदुर्ग नगरी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक म्हणून निवड होऊन न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ८९ आरोग्य सेविकांना इच्छाशक्तीमुळे लवकर न्याय मिळाला. जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना नियुक्तीपत्रे देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्याला आनंद झाला. माननीय उच्च न्यायालयासमोर असलेल्या याचिकेमुळे या आरोग्य सेविकांची निवड होऊन नियुक्तीपत्रे लाभली होती. यातून मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी न्यायालयीन पातळीवर पाठपुरावा केला. व आरोग्य सेविकांचा हा प्रश्न मार्गी लागला. त्यांना या राज्य शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ८९ आरोग्य सेविकांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावता आला याचा मला आनंद आहे! असेही मंत्री नितेश राणे यांनी भावनिक उद्गार काढले.













