रायफल शूटिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सार्जंट अनंत चिंचकरचे सावंतवाडीत जंगी स्वागत

कळसूलकर हायस्कूलच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सावंतवाडी शहराचे नाव उज्वल करणाऱ्या सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याचे सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आले. गवळी तिठा येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर प्रशालेत त्याचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा अभिमान असलेल्या सार्जंट अनंतने दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारले. या अतुलनीय यशानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी दीपकभाई केसरकर यांचे कार्यालय, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, आणि बाजारपेठ या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीनंतर प्रशालेच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, एनसीसीचे श्री. गवस, श्री. बागुल, वैभव केंकरे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अनंतच्या या कामगिरीमुळे शहरात आनंदाचे वातावरण असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.