पणजी, सप्टेंबर २०२५: केरी-फोंड्याचे रहिवासी अतुल उल्हास चारी, वय २९, सध्या फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेत ‘इंजिनीअरिंग अॅण्ड मेंटेनन्स-इन स्टोअर्स’ विभागात जबाबदारी सांभाळत आहेत. आज जेथे तो उभा आहे, तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी खूपच कठीण वाटचाल केली आहे. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मर्यादित साधनांमध्येही त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न केले. केवळ चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी आपले ध्येय गाठले आहे . त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल दैनिक गोमंतकने घेतली असून, ती इतरांसाठीही निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते.
अतुल यांचे बालपण एका कारागिरीच्या वातावरणात गेले. त्यांचे वडील हे पारंपरिक लोखंडी फॅब्रिकेशन आणि सुतारकामाचा व्यवसाय करतात. लहानपणापासूनच अतुल वडिलांना कामात मदत करत असत. वेल्डिंग, वूड टर्निंग, लेथ मशीनचे काम असे अनेक तांत्रिक कौशल्य त्यांनी वडिलांकडूनच शिकले.
अतुल यांनी आपलं शालेय शिक्षण शशांक सावित्री हायस्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण होऊन, पी.एस. कॉलेज, फर्मगुडी येथून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी संपादन केली. मात्र, शिक्षणाच्या प्रवासातही त्यांच्या मनात नेहमी काहीतरी वेगळं आणि स्वतःचं करण्याचीच ओढ होती.
आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ओढ त्यांनी प्रत्यक्षात उतरवली ती २०१७ साली, जेव्हा त्यांनी फक्त दोन जनावरांपासून डेअरी व्यवसायाची सुरुवात केली. पुढील दोन वर्षांत त्यांनी व्यवसाय हळूहळू वाढवत पाच ते दहा जनावरांपर्यंत पोहोचवला. या काळात विक्री, खरेदी आणि वेळेचे व्यवस्थापन यासारखे महत्त्वाचे धडे त्यांना मिळाले. मात्र, एक चुकीचा निर्णय त्यांच्या पाठी लागला—एकाच वेळी दहा जनावरे विकत घेतल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण आला आणि महामारीचेही दुष्परिणाम व्यवसायावर पडले. अखेर २०२३ मध्ये त्यांनी व्यवसाय थांबवण्याचा कठीण पण आवश्यक निर्णय घेतला.
” मला गाड्यांची खूप आवड आहे, आणि आता हळूहळू विमानेही आवडू लागली आहेत,” असे अतुल सांगतो.
फ्लाय९१ गोव्यात आपली विमानसेवा सुरू करणार असल्याची जाहिरात अतुलने एका वृत्तपत्रात पाहिली आणि त्याने तात्काळ अर्ज केला. सुरुवातीला त्याने मेंटेनन्स लाइन विभागात प्रवेश केला, पण सध्या तो फ्लाय९१च्या इंजिनिअरिंग स्टोअर्स विभागात कार्यरत आहे.
अतुल चारी यांची ही कहाणी म्हणजे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका तरुणाने अपार कष्ट, चुकांतून शिकण्याची तयारी आणि नव्या संधी शोधण्याच्या जिद्दीच्या जोरावर घडवलेला यशस्वी प्रवास आहे.












