राजापूर प्रतिनिधी नूतन विद्यामंदिर ओणी व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गुरुवर्य शहाजीराव खानविलकर यांच्यावर बुधवारी दुपारी ओणी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवर व राजापूर, लांजा तालुक्यासह विविध भागातील मान्यवर उपस्थित होते.
गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या ओणी येथील निवासस्थानी धाव घेत खानविलकर परिवाराचे सांत्वन केले.
बुधवारी सकाळी खानविलकर यांचे पार्थिव ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्या मंदिर ओणी व कनिष्ठ महाविद्यालय ओणी येथील त्यांच्याच नावाने बांधण्यात आलेल्या गुरूवर्य शहाजीराव
भाऊराव खानवलिकर सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवर, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, माजी शिक्षक, मराठा समाज सेवा संघाचे पदाधिकारी यांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख यांनी या ठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राजापूर मराठा समाज सेवा संघाच्या वतीनेही त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर त्यांची ओणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र एड. गुरूदत्त खानविलकर यांनी त्यांना मुखाग्नी दीला. याप्रसंगी मोठया संख्येने अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजापूर पत्रकार संघाच्या वतीने गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांना श्रध्दांजली
राजापूर पत्रकार संघाच्या वतीने गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांना श्रध्दांजली यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राजापूर पत्रकार संघाशी खानविलकर यांचे कायमच स्नेहपुर्ण संबध राहिले आहेत. राजापूर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांनी ५० हजाराची देणगी दिलेली आहे. या देणगीच्या व्याजातुन आपले गुरू कै. नाखरे गुरूजी यांच्या स्तृतीप्रित्यर्थ हा आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षकाला द्यावा असे गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांची विनंती होती. दरवर्षी अशा प्रकारचा पुरस्कार संघाच्या वतीने दिला जातो. अशा प्रकारे आपल्या गुरूप्रती नातं जपणारे आणि हजारो विद्यार्थी घडविणारे अनेकांचे गुरू असलेल्या गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांना पत्रकार संघाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.











