राजापूरात शुक्रवारी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): कुणबी-ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे आहे. इतर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार कुणबी समाजोन्नती संघ राजापूर शाखेच्या बैठकीमध्ये करण्यात आला. कुणबी-ओबीसी आरक्षण वाचविण्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी येत्या शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूचे अध्यक्ष दिपक नागले यांनी केले आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी समाजाच्यावतीने कुणबी एल्गार आंदोलन छेडण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राजापूरमध्ये कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या पूर्वतयारीसाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर कार्यकारीणी आणि कुणबी समाजनेत्यांची बैठक झाली. या बैठकीला कुणबी समाजोन्नती संघाचे राजापूरचे अध्यक्ष दिपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला रविंद्र नागरेकर, प्रकाश कुवळेकर, दिपक बेंद्रे, चंद्रकांत जानस्कर, प्रकाश लोळगे, श्रीकांत राघव, रमेश सूद, प्रतिक मटकर, जितेंद्र पाटकर, सुभाष नवाळे, रमेश गोडांबे, नंदकुमार मिरगुले, उमेश शिवगण, अक्षय कशेळकर, प्रथमेश घाडी, चंद्रकांत पड्यार, मानसी दिवटे, रामचंद्र रांबाडे यांच्यासह मोठ्यासंख्येने कुणबी समाजनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. नागले यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची सद्यस्थिती आणि कुणबी-ओबीसी आरक्षण बचावाची आवश्यकता विषद केली. कुणबी समाजासह ओबीसी बांधवांसाठी ओबीसी आरक्षण निश्‍चित करण्यात आलेले आहे. असे असताना मात्र, या आरक्षणामध्ये अन्य समाजाचा समावेश करून त्यांची घुसखोरी कशासाठी ? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. ओबीसी आरक्षण बचावाच्या लढ्यामध्ये कुणबी समाजासह ओबीसीमधील सर्व समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ओबीसी आरक्षण बचाव लढा अधिक तीव्र करण्यासाठी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहामध्ये सकाळी१० वा होणार्‍या या मेळाव्यामध्ये कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. यावेळी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.