१५० कोटींच्या विकास कामांचे शासनाकडे प्रस्ताव
आपले राजापूर स्वच्छ व सुंदर राजापूर करण्याचा निर्धार
पाच हजार झाडे लावणार, पुढील वर्षीपासून दररोज चार तास पाणीपुरवठा करणार
राजापूर प्रतिनिधी : राजापूर नगर परिषदेची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वाटचाल ही निश्चितच लोकसेवक म्हणून काम करणाऱ्या आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींसह नागरिकांसाठी अभिमानाची आणि गौरवाची अशी बाब आहे. त्यामुळे या वर्षभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतानाच १५० कोटी विकास निधी प्राप्त करण्याचे ध्येय ठेवताना यातुन शहराच्या विकासाला नवा आयाम व दिशा देण्याचा आपला संकल्प असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. हुस्नबानू खलिफे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपलं राजापूर स्वच्छ व सुंदर राजापूर करण्याचा आमचा निर्धार असून या वर्षभरात शहरवासीयांच्या अपेक्षा पुर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही एड. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला बुधवार १ एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमिवर नगराध्यक्ष एड. हुस्नबानू खलिफे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत वर्षभरात नगर परिषदेच्या वतीने काय उपक्रम राबविले जाणार आहेत याबाबत माहिती दिली.
या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण राजापूर शहरातील सार्वजनिक हिताच्या विविध प्रकारच्या १५० कोटी रूपये कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये राजापूर हायस्कुल समोरिल जागेत नगर परिषद नवीन प्रशासकिय इमारत, वरचीपेठ शाळेच्या जागेत मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने, वैश्यंपायन गुरूजी पुलालगत नवीन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मोठा पुल, जवाहर चौकाचे सुशोभिकरण, गणेशघाट ते कोंढेतड पुलापर्यंत नदीकिनारी सुशोभिकरण, वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणात बैठक व्यवस्था व कंपाऊंड वॉल, शहरातील कै. भिकाजीराव चव्हाण उद्यानाचे नमो उद्यान योजनेंतर्गत अत्याधुनिक पध्दतीने सुशोभिकरण, पाणीपुरवठा योजना चांगली करताना नळसंयोजनाला मिटर बसविणे, नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानी नुतनीकरण करणे, शहरात डिजिटल जाहिरात फ्लॅटफॉर्मची निर्मिती करणे, शहरातील जवाहर चौकासह अन्य चौक व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, नगर परिषदेच्या विश्रामगृहाचे जागी नवीन अत्याधुनिक असे नवीन व्यापारी संकुल कम विश्रामगृह उभारणे अशी महत्वपुर्ण विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
तर नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोदवली येथील नवीन धरणाचे काम पुर्ण झाले असून यावर्षी गेट टाकण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आता पाणीसाठा होणार असून पुढील वर्षीपासून दररोज चार तास शहर वासीयांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरित राजापूर सुंदर राजापूर उपक्रमांतर्गत यावर्षी शहरात पाच हजार झाडे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजापुरचे जागृत देवस्थान श्री देव धुतपापेश्वर मंदिराकडे शहरातुन जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी पर्यटन विकास कार्यक्रमातुन आपण ३५ लाखाचा निधी उपलब्ध केलेला असून आणखी २५ लाख नगरोत्थान योजनेतुन निधी आणून या रस्त्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी अभियानांतर्गतही शहराच्या विकासाची कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर सहकारी सर्व सहकारी नगरसेवक, नागरिक यांच्याकडून येणाऱ्या सुचना, विकासात्मक कामे यांबाबतही विचार करून त्याबाबतही आंम्ही कार्यवाही करू असेही एड. खलिफे यांनी नमुद केले.
नगर परिषदेच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी नियोजन करताना शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा आमचा मानस आहे. सन २००१ मध्ये नगर परिषदेला १२५ वर्षे पुर्ण झाली होती त्यावेळीही मीच नगराध्यक्ष होते व आज १५९ वर्ष होत असतानाही पुन्हा मीच या नगराध्यक्षपदावर आहे. नक्कीच हा योगायोग असुन या पदाच्या माध्यमातुन माझ्या शहरवासीयांसाठी काहीतरी करता येणार आहे हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे. सर्वांना सोबत घेऊन आपण विकासात्मक राजापूर शहराची कशी प्रगती होईल यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी नमुद केल. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत यांचे भक्कम पाठबळही आपल्याला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात राजापूरच्या सर्वांगिण विकासाचा वेग वाढलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव उपस्थित होते.












