राजापूर | प्रतिनिधीः युवा कॅरम प्रेमी, राजापूरच्यावतीने आयोजित आणि माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे पुरस्कृत करण्यात आलेल्या ‘रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा 2023’ मध्ये योगेश कोंडविलकर, ओम पारकर, द्रोण हजारे, निधी सप्रे यांनी आपापल्या गटांमध्ये विजेतेपद पटकाविले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरविण्यात आले.
राजापूरात झालेल्या या स्पर्धेचे माजी नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदींच्या उपस्थितीमध्ये नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जेष्ठ कॅरमपटू श्रीकांत ताम्हणकर, जेष्ठ कॅरमपटू दिलीप कोरगावकर, एलआयसीचे श्री. कामतेकर, राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर, राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आदींसह मोठ्यासंख्येने कॅरमपटू उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील दिडशेहून अधिक खेळाडूंनी विविध गटांमधून सहभाग घेतला होता. यामध्ये पुरूष एकेरीच्या झालेल्या सामन्यामध्ये योगेश कोंडविलकर याने मनोज सप्रे तर, दिनेश पारकर याने सौरभ महाकाळ याच्यावर उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मात करून पुरूष एकेरी गटाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्पर्धेच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये दिनेश पारकर याचा पराभव करीत योगेश कोंडविलकर याने पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकाविले. पुरूषे दुहेरीच्या झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये अभिजीत खेडेकर-दिपक वाटेकर जोडीने मुक्तानंद वरवडेकर-सुनिल जाधव जोडीचा तर, राहुल भस्मे-विजय कोंडविलकर या जोडीने राजेंद्र कदम-राहुल कदम जोडीचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, झालेल्या अंतिम सामन्यामध्ये राहुल भस्मे-विजय कोंडविलकर या जोडीचा पराभव करीत अभिजीत खेडेकर-दिपक वाटेकर या जोडीने विजेतेपद पटकाविले. कुमार गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ओम पारकर याने अमिन काझी तर, सर्वेश महाकाळ याने सिद्धांत मराठे याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये सर्वेक्ष महाकाळ याचा पराभव करीत ओम पारकर याने कुमार गटाच्या एकेरीचे विजेतेपद पटकाविले. किशोर गटाच्या एकेरीच्या अंतिम झालेल्या सामन्यांमध्ये वेदांत कनगुटकर याचा द्रोण हजारे याने तर, किशोरी गटाच्या एकेरीमध्ये स्वरा मोहिरे हिचा पराभव करून निधी सप्रे हिने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलींद साप्ते, मंदार दळवी, मोहन हजारे, सचिन बंदरकर, यांच्यासह युवा कॅरम प्रेमी संघटनेचे मनोज सप्रे, भाई वायंगणकर, अशोक पुजारी, मनिष कोळेकर, राजा देसाई, स्वप्नील हेळेकर, माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी युवा कॅरमप्रेमी, राजापूरच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली.