दगड माती वाहून गेल्याने मार्ग बनला धोकादायक
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. कुंभारमाठ देवली चिपी विमानतळाकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावरील देवली हॉटेल गारवा नजीकच्या धोकादायक वळणावरील रस्ता बुधवारी खचला असून दगड माती वाहून गेल्याने मार्ग धोकादायक बनला आहे.
या धोकादायक वळणावर सातत्याने असे प्रकार घडत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मे महिन्यात याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता खचून माती दगड वाहून गेल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याठिकाणी अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.