सरोदे समाज युवा संघटनेतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात; तब्बल 152 रक्तदात्यांनी केले यशस्वी रक्तदान

दापोली प्रतिनिधी: ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. आज शहरातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने दापोली तालुक्यातील सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर यांचे वतीने नुकतेच भागवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नाही, तर ते एक मानवतेचे प्रतीक आहे. रक्ताची गरज ही कोणत्याही क्षणी, कोणालाही भासू शकते मग तो आपला आप्तस्वकीय असो, मित्र असो किंवा एखादा अनोळखी व्यक्ती. आपण केलेले रक्तदान एखाद्या अत्यवस्थ व्यक्तीचा जीव वाचवू शकते. आपल्या देशात दररोज हजारो रुग्णांना अपघात, शस्त्रक्रिया, थँलेसेमिया, कॅन्सर अशा अनेक कारणांसाठी रक्ताची आवश्यकता असते. आजही अनेक रुग्ण केवळ वेळेवर रक्त न मिळाल्याने जीव गमावतात. ही बाब अत्यंत गंभीर असून आपण सर्वांनी याबाबतीत जागरूक होणे गरजेचे आहे. तरुण पिढीने या सामाजिक कार्यात पुढाकार घेवून रक्तदान चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात केले.

संघटनेच्या विविध उपक्रमांपैकी या उपक्रमाचे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. तुषार भागवत यांचे हस्ते झाले .त्याप्रसंगी डॉ. माधवी साठे , संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली प्रमुख श्री रुपेश वाईकर व अन्य मान्यवर उपस्थित होते .रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे समजून सदर रक्तदान शिबिरासाठी विविध स्तरातील अनेक रक्तदात्यांनी आपला सहभाग दिला. संघटनेचा पहिला उपक्रम असून देखील तब्बल १५२ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये आपले कर्तव्य बजावले. दापोली मेडिकल कॉलेज दापोली, संतोष अबगुल प्रतिष्ठान , तसेच सायन ब्लड बँक यांचे सहकार्य रक्तदान शिबिरासाठी मिळाले.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत , सचिव श्री संदीप क्षीरसागर यांनी विशेष लक्ष दिले. तसेच प्रकल्प संचालक श्री रुपेश रसाळ, प्रकल्प समन्वयक श्री शुभंकर यादव व संघटनेच्या सर्व सभासदानी रक्तदान शिबिरासाठी काम केले.