दापोली प्रतिनिधी:- मुंबई विद्यापीठ मुंबई येथील सर कोवसजी जहांगीर पदवीदान सभागृहात पार पडलेल्या प्रतिष्ठित 558 व्या युवा महोत्सवाच्या मेहंदी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजची एफ.वाय.बी.एस.सी. मधील विद्यार्थिनी महेक अमजद रमजाने हिने आपल्या अप्रतिम कलाकुसरीने कांस्यपदक पटकावले.
मुंबई विद्यापीठाच्या तब्बल 12 झोनमधून 77 स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती. या स्पर्धेत महेकने ‘अरेबिक फ्लोरल’ प्रकारातील नक्षीदार व मोहक मेहंदी साकारत कांस्यपदकाला गवसणी घातली.
या यशामागे महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा.कैलास गांधी यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले, तर प्रा.दिपाली नागवेकर यांनी संघ समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर एस.वाय.बी.एस.सी. मधील विद्यार्थिनी पायल खानविलकर हिने सहाय्यकाची भूमिका निभावली.महेकच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे तसेच उपप्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












