Uday Samant : एक ऐवजी अर्धी भाकरी; त्यात वेगळे काय?

शिवसेना भाजपविषयीच्या अफवांवर उदय सामंत यांचा खुलासा

मुंबई : अजित पवारांसकट (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीदेखील शिवसेनेच्या काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधल्याचा दावा केला. शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) राजीनामा देणार अशाही चर्चा माध्यमांतूनकेल्या जात आहेत. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देणारा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री राजीनामा देणार ही अफवा आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे खोटे आहे. आमच्यावर गेल्या काही काळापासून अत्यंत घाणेरडी टीका होत होती. त्यातूनच आता ही अफवा उठविण्यात आली आहे, असे सामंत म्हणाले. तिकडे तेरापैकी सहा आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. कालच तीन चार जणांशी बोलणे झाले. फक्त त्यांनी मुंबईत नको भेटूयात असे सांगितले आहे. यामुळे दुसऱ्या राज्यात किंवा ठिकाणी आम्ही भेटणार आहोत. विरोधक जो आकडा सांगतायत तो बरोबर आहे, पण ते हे आमदार आहेत, असे सामंत म्हणाले.

एकऐवजी अर्धी भाकरी; त्यात वेगळे काय?

मी आता १७५ जागा लढविणार असे सांगितले तर त्याला काही अर्थ नाही. लोकशाही आहे. आमचे ५० आहेत, त्यांच्यासोबत आलेले आहेत त्या जागा ते लढवतील आणि भाजपासोबत असलेल्या त्यांच्या जागा क्लिअर होतील, असे उदय सामंत म्हणाले. एक भाकरी मिळणार होती ती आता अर्धी मिळेल, त्यात वेगळे काय आहे? दोघांमध्ये आता मंत्रिपदे वाटली जाणार असल्याने एक दोन इकडे तिकडे होऊ शकतात, असा खुलासा सामंत यांनी केला आहे.

४५ खासदार निवडून येण्यासाठी अजित पवारांची मदतच

अजित पवार जर महायुतीत येणार असतील तर आमची ताकद वाढणार आहे. आम्हाला ४५ खासदार निवडून येण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. यामुळे बहुमत असतानाही आम्ही त्यांना सोबत घेतले आहे. बच्चू कडू यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. काही राहिले असेल तर ते पूर्ण केले जाईल, असे सामंत म्हणाले.