विद्यामंदिर कणकवली मध्ये गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात साजरी

 

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अत्यंत भक्तिमय वातावरणात “माता-पिता पाद्यपूजन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता सहावीच्या पालकांना निमंत्रित करण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे दुधाने पाय धुवून, चंदन हळद लावून, फुले वाहून पाद्यपूजन केले व त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी सर्व पालक भाऊक झाले होते. तर काही पालकांना आपल्या भावना अनावर होऊन त्यांनी आपल्या भावनांना अश्रुंनी वाट मोकळी करून दिली. पालकांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री पी.जे. कांबळे यांचे शतशः आभार मानले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.जे. कांबळे यांनी सांगितले की आपल्या जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके ही आपले गुरु आहेत. मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढवणे हे शिक्षक व पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच आजची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून भारतीय संस्कृती विसरत चालली आहे. अशा परिस्थितीत शिक्षक आणि आई-वडिलांची मोठी जबाबदारी आहे की त्यांनी या पिढीला भारतीय संस्कार, परंपरा सांगितल्या पाहिजेत, शिकवल्या पाहिजेत. तरच ही संस्कृती टिकून राहील.

यावेळी पर्यवेक्षिका व्ही. बी. जाधव, ए. व्ही. वणवे, जे. जे. शेळके यांनीही गुरूचा महिमा वर्णन केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी चिंदरकर आणि दूर्वा पवार या विद्यार्थिनींनी केले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्य पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.