हळवल परबवाडी रस्त्यावर वाहून येणारा त्या डोंगराचा चिखल वाहनचालकांना ठरतोय डोकेदुखी.!

कणकवली : तालुक्यातील हळवल गावात देवतळी स्टॉपनजिक एका डोंगराचे उत्खनन करून प्लॉट तयार करण्यात आले आहेत. मात्र सदरचा डोंगराळ भाग हा वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. अनेकदा या ठिकाणी छोटं मोठे अपघात देखील झाले आहेत. असे असताना संबंधित प्लॉट मालक यांचे तेथील प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते त्याच रस्त्याने ये – जा करतात मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.

 

सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सदरचा डोंगर पाण्याच्या लोटाबरोबर थेट रस्त्यावरच वाहून येत असल्याने साधारणपणे अर्धा फूट उंच थराचा चिखल तेथे साचतो. तसेच या रस्त्यावर शालेय मुले, वृद्ध व्यक्ती, छोट – मोठी वाहन ये – जा सुरू असते. त्यामुळे याचा मनस्ताप हळवल गावातील तसेच हळवल मार्गे शिवडाव असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. किमान आता तरी संबंधित जमीन मालक याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर वाहून येणारा डोंगराचा चिखल योग्य उपाययोजना करून मार्गी लावतील का ? असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने देखील संबंधित जमीन मालकांना सूचना करून रस्ता चिखलमुक्त करून योग्य उपाययोजना करून डोंगरातून वाहून आलेल्या मातीने बुजलेली गटारे सुस्थितीत करून डोंगरातून येणारे पाणी रस्त्यावर न सोडता गताराच्या माध्यमातून सोडून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे.