रत्नागिरीतील बचत गटांच्या समन्वयक, सदस्य होणार सहभागी
चर्चासत्र, कार्यशाळा, स्टॉल्स मांडणार
रत्नागिरी : भारताकडे जी- २० गटाचे अध्यक्षपद असून या अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजतर्फे डब्ल्यू- २० परिषद, चर्चासत्र, कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. रत्नागिरीत प्रथमच अशी परिषद होणार आहे. या परिषदेत रत्नागिरी तालुक्यातील बचत गटांच्या क्लस्टरच्या समन्वयिका व सदस्य सहभागी होणार आहेत. १५ जुलैला शिरगाव येथील संस्थेच्या कडवाडकर संकुलातील पवार सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रकल्प समिती सदस्य प्रकाश सोहोनी, प्रसन्न दामले, शिल्पा पानवलकर, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत आणि बीसीए कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी- २० अध्यक्षतेच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन, भारत ३२ वेगवेगळ्या शहरांमधील ५० हून अधिक शहरामध्ये २०० हून अधिक बैठकांचे आयोजन करत आहे. त्या अनुषंगाने डब्ल्यू-२० परिषद रत्नागिरीत आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
भारत सरकारने एसएनडीटी महिला विद्यापीठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू- २० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने एसएनडीटी विद्यापीठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू- २० आयोजनासाठी केली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगांव येथील एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेनला डब्ल्यू- २० च्या आयोजनाची संधी मिळाली आहे.
वुमन लिड डेव्हलपमेंट याअंतर्गत ग्रासरूट वुमन लिडरशीप या विषयाची निवड केली आहे. यात बीसीए कॉलेजने रत्नागिरीतील विविध बचत गटांच्या समस्या व सूचना एसएनडीटी विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. यामध्ये तालुक्यातील बचत गटाच्या सर्व १० क्लस्टर को- ऑर्डिनेटर्स यांचे तळागाळातील महिलांचे नेतृत्व या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. याचबरोबर डिजीटल मार्केटिंग, सायबर सिक्युरिटी आणि नेटबॅंकिंग या संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी सांगितले. या १० क्लस्टर्सचे बचतगट स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे १९९९-२००० पासून शिरगांव, रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेन अत्यंत प्रभावी व कार्यक्षमपणे कार्यरत असून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्नीत आहे. डब्ल्यू- २० परिषदेत सकाळी १० ते ११.३० या वेळेत महिलांना सहभागी होता येईल. या कार्यक्रमाला महिला बचत गट समन्वयक, सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.