खासगी व्यक्तीलाही अटक
रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चिपळूण परिसरात मोठी कारवाई करत सावर्डे पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला लाच प्रकरणात अडकवले आहे. अपघातातील वाहनाचा तपास अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना खासगी इसमासह या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका अपघात प्रकरणाचा (गु.र.नं. १४/२०२६) तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांच्याकडे होता. या अपघातातील मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळवण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करायचा होता. त्यासाठी तक्रारदार वकिलांना अपघातातील वाहनाचा ‘आरटीओ तपासणी अहवाल’ आणि ‘डीओआर फॉर्म’ हवा होता. हे कागदपत्रे देण्यासाठी उपनिरीक्षक कांबळे यांनी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, कांबळे यांनी तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम चिपळूण पोलीस स्टेशन जवळ असलेल्या ‘सोमेश्वर जनरल स्टोअर्स’मध्ये खासगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (वय ४२) याच्याकडे देण्यास सांगितले.
सोमवारी (२३ फेब्रुवारी) सापळा रचला असता, अभिजित शिर्के याने पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. कांबळे यांच्या सांगण्यावरून शिर्के याने पंचासमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शिर्के याला ताब्यात घेतले असून, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी एसीबीचे उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता.
रत्नागिरी एसीबीने जनतेला आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल, तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ७०३८३९१०६४
रत्नागिरी कार्यालय: ०२३५२-२२२८९३
मोबाईल: ७५८८९४१२४७, ९८७०४७४५३५











