रत्नागिरी : शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सापळा रचला.
पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रत्नागिरी शहरात धडक कारवाई करत संशयित इको गाडी अडवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यात ३ लाख २७ हजार ९०४ रुपयांचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी या मालासह ३ लाख ५० हजार रुपये किमतीची इको गाडी, असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस कर्मचारी राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.











