वैभववाडीत लवकरच सहकार भवन उभारणार
वैभववाडीत सहकार मेळावा संपन्न : खरेदी विक्री संघाचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : तळकोकणात आर्थिक समृद्धीचा एकमेव मार्ग सहकार आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार हा सर्वात गतिमान मार्ग आहे. सहकार क्षेत्रात देखील आपण आता मागे राहायचं नाही. सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या युवकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करणार असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी तालुक्यात सहकार भवन इमारत तसेच खरेदी विक्री संघाची भव्य इमारत लवकरच उभारणार असे आश्वासनही नितेश राणे यांनी दिले.
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय सभागृहात सहकार मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन तुळशीदास रावराणे, भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, सीमा नानिवडेकर, बाळ परब, स्नेहलता चोरगे, श्रद्धा रावराणे, के. पी. कुंभार, सज्जनकाका रावराणे, संभाजी रावराणे, अंबाजी हुंबे, रमेश तावडे, शारदा कांबळे व संस्थांचे चेअरमन, माजी सभापती, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात तुमचा हक्काचा माणूस आता आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रस्ताव आले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्राचे सर्व प्रस्ताव येतात. कोकणातून देखील आले पाहिजेत. सहकार मेळावा वैभववाडी तालुक्यात होतोय याचा निश्चित अभिमान आहे. हीच संकल्पना आता प्रत्येक तालुक्यात राबविणार असेही त्यांनी सांगितले.
वैभववाडी खरेदी विक्री संघासाठी इमारत बांधून दिली जाईल. युवकांनी सहकारात उतरले पाहिजे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीज लाख आहे. हे उत्पन्न साडेचार लाख करण्यासाठी सहकार हा एकमेव मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. दुसरी पिढी सहकारात उभी रहातेय याचा निश्चित अभिमान आहे. त्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे. एआय चा अभ्यास सहकार क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी देखील केला पाहिजे. एआय मुळे सर्व क्षेत्रात क्रांती घडत आहे. बँकेतील प्रश्न काही मिनिटात एआयमुळे सुटत आहेत. एआय युक्त जिल्हा आपण केला आहे.
युवकांना रोजगार देण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. लवकरच बँक भरती होत आहे. यात कोणाचीही फसवणूक होणार नाही. पारदर्शक व अधिकृत ही भरती होणार आहे. ज्या ज्या मागण्या शेतकऱ्यांकडून येतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे. सहकार भवन या ठिकाणी लवकरच उभे राहील व देशाचे अनेक तज्ञ या ठिकाणी येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे यांचे नितेश राणे यांनी अभिनंदन केले.
मनीष दळवी म्हणाले, वैभववाडी तालुक्याला सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सहकार या ठिकाणी रुजवूया. सर्वांच्या सहकार्यातून ही विचारधारा आपण पुढे नेऊया. जिल्हा बँक सहकाराला निश्चित बळकटी देईल. बाजार समितीच्या मार्केट साठी पाच कोटीची इमारत होत आहे. काजू उत्पादनाला योग्य दर पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे मिळाला आहे. विकास संस्थेला केंद्र शासनाच्या माध्यमातून संगणक संच देण्यात आले आहेत. संस्था भक्कम व पारदर्शक व्यवहार करण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. सहा महिन्यात १०० नवीन सचिवांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दर दिवशी एक लाख लिटर इतके दुधाचे उत्पादन झाले पाहिजे. यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अशा व्यवसायकडे आपण वळले पाहिजे. सहकार मेळावा ही संकल्पना दोडामार्ग पर्यंत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. प्रमोद रावराणे यांनी सहकार मेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सन 1939 मध्ये कोल्हापूर शेतकरी संघाची स्थापना नावळे येथील श्री. रावराणे यांनी केली. सिंधुवैभव ऍग्रो फार्मर्सच्या मार्फत १८०० शेअर्स या ठिकाणी काढण्यात आले आहेत. तसेच तालुक्यात सहकार भवन व खरेदी विक्री संघाची इमारत उभी राहावी अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. यावेळी खरेदी विक्री संघाच्या वतीने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त संभाजी रावराणे सांगुळवाडी, विलास देसाई य एडगाव, विलास नावळे लोरे, गौरी परब माईणकर तिथवली, अरविंद पेडणेकर नाधवडे, गोपाळ कृष्ण बचत गट महेश संसारे मांगवली या सर्वांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विकास संस्थेत उत्कृष्ट काम करणाऱ्या चेअरमन व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विकास संस्थेचे चेअरमन, संचालक, सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळी, नागरिक, युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









