आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी केली मागणी
जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातील त्या आरोपीविरुद्ध कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे भेट देऊन केली.
नाटे सागली पोलीस स्थानकाच्या हद्दीप गुरूवारी एका तरूणीच्या विनयभंगाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नाटे पोलीसांनी एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातून सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामीण महिलांची स्वावलंबी संघटना त्रिवेणी फेडरेशन राजापूर आणि महिला दक्षता समितीतील महिलांनी सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेतली व याबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी या महिलांनी या आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असेल तर त्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे एक निवेदनही महिलांनी वाघ यांना दिले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईबद्दल महिलांनी अभिनंदन केले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रकरणी त्या आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम 78(2) व 79 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी अणसुरे, दांडे, दळे जैतापूर नाटे, मीठगवाणे, भालावली आडिवरे आदी पश्चिमेकडील अनेक भागातील प्रतिनिधिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकरणात महिलांची एकजूट ठळकपणे दिसून आली.











