कोकण रेल्वे सेवापूर्तीला 30 वर्षे – खेडमध्ये कार्यक्रम

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे या जनतेच्या स्वप्नवत प्रकल्पाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 सप्टेंबर 1995 रोजी स्थानकाचे उद्घाटन झाले, तर 27 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वेची पहिली प्रवासी फेरी धावली होती. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ खेड रेल्वे स्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅरिस्टर मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे अधिकारी व स्टेशन मास्टर श्री. रफिफ नांदगावकर, पॉईंट्समन कदम तसेच होमगार्ड समादेशक (सुरक्षा) श्री. कडू यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जैन संघटना व रेल्वे यात्री मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तमकुमार जैन, कोकण विभागीय अध्यक्ष योगेश जैन, विभागीय सचिव मुकेश जैन, जिल्हाध्यक्ष महेश जैन, दापोली अध्यक्ष राहुल जैन तसेच खेडचे दीपक जैन उपस्थित होते.