माजगांव येथे २९० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त : दोघांना अटक

सावंतवाडी : कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा झायलो वाहनातून बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य जनावराचे मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे. या वाहनातून २९० किलो मांस विनापरवाना जप्त करण्यात आले असून, वाहनासह दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे १२ ते ४ या वेळेत माजगाव येथील गोठणेश्वर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी (GA 03R- 7793 ) क्रमांकाच्या महिंद्रा झायलो वाहनाची तपासणी करण्यात आली.
​या तपासणीत, वाहनातून बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य जनावराचे २९० किलो मांस कर्नाटकहून गोवा येथे वाहतूक केले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौस मुजावर (वय ३७, रा. म्हापसा, गोवा) आणि रबानी भंडारी (वय ३०, रा. हनगल, कर्नाटक) अशी आहेत.
​आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ९ आणि मोटर वाहन कायदा कलम १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
​दरम्यान, पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत. अशा प्रकारची कोणतीही अवैध मांस किंवा प्राणी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.