हत्ती ‘ओंकार’ची तेरेखोल नदी पार करत सातोसे रेखवाडीत धडक

हत्ती थेट लोकवस्तीत : स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण 

​बांदा । प्रतिनिधी :

​गोव्याच्या हद्दीतून परतलेल्या ‘ओंकार’ हत्तीने शनिवारी सायंकाळी तेरेखोल नदी पार करत मडुरा – सातोसे सीमेवर असलेल्या रेखवाडीत आपली हजेरी लावली. यामुळे स्थानिकांमध्ये मोठी पळापळ झाली असून, हत्ती थेट लोकवस्तीत दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दुसरीकडे हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वनविभागाची तारांबळ उडाली आहे.

​दोंडामार्ग तालुक्यातून केर गावातून आलेला ‘ओंकार’ हत्ती सुरुवातीला नेतर्डे, डिंगणे, डोंगरपाल परिसरात वावरला होता. त्यानंतर तो मोपा कडशी मार्गे गोव्याच्या हद्दीत गेला होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून त्याचा वावर तोरसे, तांबोसे या गोवा हद्दीतील गावात होता, ज्यामुळे वनविभाग निश्चित झाला होता. मात्र, शनिवारी सायंकाळी त्याने अचानक तेरेखोल नदी पार केली आणि सातोसे रेखवाडी परिसरात प्रवेश केला.

​ ​हा हत्ती थेट गावात, अनेकांच्या अंगणात तसेच राजन वर्धम यांच्या घरा नजीक दाखल झाल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. त्याने वस्तीतील पाणंदीमध्ये फिरत भातशेती आणि भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

​ ​विशेष म्हणजे, ‘ओंकार’ म्हणून हाक मारल्यानंतर हा हत्ती प्रतिसाद देत असल्याची माहिती परिसरात पसरली आहे. यामुळे त्याला पाहण्यासाठी नागरिकांची, तरुणांची गर्दी वाढू लागली आहे. लोकांकडून होणारी ही गर्दी आणि त्याला कॅमेऱ्यात कैद करण्याची चढाओढ वन विभागासाठी मोठी समस्या बनली आहे.

​हत्ती भरवस्तीत दाखल झाल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सातोसे मडुरे येथील जंगल परिसरात ‘ओंकार’चा सध्या वावर असून, सिंधुदुर्ग वनविभागाचे २० जणांचे पथक त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

​वन विभागाच्या जलद कृती दलाकडून हत्तीला वस्तीत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांनी ग्रामस्थांना कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आणि हत्तीपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ‘ओंकार’ने पुन्हा गोव्याच्या हद्दीत प्रवेश करू नये यासाठी गोवा वनविभागाचे कर्मचारी तेरेखोल नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आहेत.

​सावंतवाडीचे परिक्षेत्र वनअधिकारी सुहास पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोऱ्हाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि वनविभागाच्या पथकाला आवश्यक सूचना दिल्या. सध्या हत्तीचा वावर रेखवाडीतील भाटले परिसरात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.