शिवशंभो सामा.कला- क्रीडा मंडळ,कुळाचीवाडी फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित “श्रीदुर्गामाता दौड” उदंड उत्साहात संपन्न !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– पाठीमागे सह्याद्रीच्या लांबच लांब दर्यापाड्या आणि उत्तुंग पहाड च्या निसर्गरम्य कुळाची वाडी येथील शिवस्मारकापासून “दुर्गामाता दौड” प्रारंभ झाली. सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, मावळ्यांचा उत्साह ओसंडत होता, वाडी वरील अबालवृद्ध,युवाई आणि लहान बालकांपासून शाळेतील मुलं-मुली स्मारकाकडे येऊ लागली. शिवछत्रपतींच्या पूजनानंतर भगव्या ध्वजाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजांची आरती संपन्न झाली.
स्वराज्याच्या स्थापनेसाठी, माता जिजाऊंनी दुर्गामातेची उपासना केली. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांनी, दुर्गा उपासनेसह, मावळ्यांना एकत्र करून,अत्याचाराबद्दल आवाज उठवत, मोगलांना सळो की पळो करून सोडले. असा भक्तीसंदेश निखिल तेली यांनी उपस्थितांना दिला. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी,अन्यायाबद्दल उठाव करण्यासाठी, दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ही दुर्गमाता दौड प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अक्षय धुरी यांनी यावेळी व्यक्त केला. ध्वजदारी धारकरींच्या साथीने, हर हर महादेव | जय भवानी, जय शिवाजी | छत्रपती शिवाजी महाराज की जय | छत्रपती संभाजी महाराज की जय | चा जयजयकार, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात प्रतिध्वनीत झाला.
ही दौड कुळाचीवाडी, मारुती मंदिर, मारुतीवाडी,बाजारपेठ मार्गे पेठेतील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये पोहोचली. वाटेत अनेक ठिकाणी ग्रामस्थ, महिला बंधू-भगिनींनी ध्वजाचे औक्षण करून वंदन केले.जय शिवराय |भारत माता की जय | हर महादेव च्या बुलंद घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांनी बाजारपेठ आणि दौड मार्ग दुमदुमला. राधाकृष्ण मंदिर येथे शिवस्तवन, स्फूर्ती गीते सादर केली.आणि दुर्गामाता दौड बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी रेवती मेस्त्री, स्नेहलता पांचाळ, नयन लाड, ओमकार लाड, विठ्ठल लाड, गणेश लाड, आदिनाथ आणि सहकाऱ्यांनी शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके, तलवारबाजी दाखविली. देवहा देवतांच्या महाआरती होऊन जयजयकारात दुर्गा माता दौडची सांगता करण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवशंभो सामा कला क्रीडा मंडळ कुळाची वाडी फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड स्फूर्तीदायी ठरली…
रात्री दहा वाजता कुळदेव मंदिरात, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित, काव्यात्मक शिवचरित्र रचणाऱ्या कवी भूषण यांच्या छंदात्मक काव्यरचनाचे स्फूर्तीदायी सादरीकरण, मालवणचे श्री. भूषण साटम यांनी केले. या प्रेरणादायी आणि हिंदूधर्म रक्षणाच्या जाज्वल्य सोहळ्याला, परिसरातील अबालबुद्ध ग्रामस्थ, युवाई आणि शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनीनी एकच गर्दी केली होती. श्री.साटम यांचा यावेळी मंडळाने यथोचित सत्कार केला. फोंडा परिसर शिवमय झाला होता…











