योगाभ्यासातून ९६ वर्षीय चोडणकर आजोबांनी केली दुर्धर आजारांवर मात 

‘शरीर विज्ञान विद्यालया’च्या माध्यमातून देताहेत ‘फिटनेस ‘चे धडे

सावंतवाडी । प्रतिनिधी : वयाच्या अवघ्या चाळीशीत मधुमेह, उच्च रक्तदाब व त्यानंतर दम्यासारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त झालेल्या सावंतवाडी शहरातील मुंबईस्थित श्रीकांत चोडणकर यांनी शरीर विज्ञानाचा अभ्यास करून योग साधना करीत आपल्या सर्व आजारांवर मात केली. आज ते ९६ वर्षांचे असून आजही सावंतवाडीमधील नरेंद्र डोंगर सहज पादाक्रांत करत आहेत. शरीराची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ओळखले असून आपल्या फिटनेसचा ‘राज’ आता ते गरजू लोकांना कळावा याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी योगासनांचा वापर करून ‘शरीर विज्ञान विद्यालय’ सुरू केले आहे, ज्याचा उद्देश लोकांना निरोगी जीवनाचे महत्त्व समजावून सांगणे असा आहे.

सावंतवाडीचे सुपुत्र असलेले श्रीकांत चोडणकर सांगतात की, वयाच्या ९६ व्या वर्षीही ते पूर्णपणे तंदुरुस्त आणि चपळ आहेत. ते म्हणतात, शरीरातील अवयवांना लागणारी ऊर्जा, त्यांचे कार्य आणि त्यांना होणारे आजार यांचा अभ्यास करा. हे आत्मसात करून तुम्ही चैतन्यमय असे दीर्घायुष्य जगू शकता. मात्र, त्यासाठी नियमित व्यायाम, योग साधना, प्राणायाम तसेच

योग्य आहार महत्वाचा आहे. शरीराची नियमित तपासणी करून घेऊन आवश्यक तशा पद्धतीने उपाययोजना करून फिटनेस राखा, असेही ते म्हणाले.

श्रीकांत चोडणकर हे मूळचे सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील रहिवासी. त्यांचा जन्म गोव्यात झाला मात्र शिक्षणानंतर ते नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले. टीव्ही मेकॅनिक म्हणून ते काम करीत होते. तसेच साऊंड इंजिनियर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. वयाच्या ऐन उमेदीत असताना अवघ्या ४० व्या वर्षी त्यांना दुर्धर आजारांनी ग्रासले. त्यातच त्यांची पत्नी ‘ब्रेन हॅमरेज ‘ ने त्यांची साथ सोडून गेली. या फार मोठ्या धक्क्यातून सावरत असताना त्यांनी ही आजारपणा नेमकी कशामुळे होतात याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यातूनच शरीर विज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी योगसाधना तसेच अन्य उपायांमधून आपल्या दुर्धर आजारावर मात केली.

श्रीकांत चोडणकर यांच्या मंते, शरीराची योग्य काळजी कशी घ्यावी, हे माहीत नसल्यामुळे अनेक लोक अतिशय कमी वयात आजारांना बळी पडून अल्पायुषी ठरतात आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता गमावून बसतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला आपल्या अवयवांच्या कार्याबद्दल काहीच माहिती नसते. तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. आजारांची माहिती घ्या व त्यावर योग्य उपाययोजना करून योग साधनेतून तुमच्या शंभरीचा झेंडा तुम्ही हिमशिखरावर फडकवा. मी-तुमच्या पाठीशी आहे, असे ते सांगतात.

आज त्यांची मुलं, पुतणे, तसेच नातवंड ही मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. एक नातू बायोमेडिकल तर दुसरा बायो केमिस्ट्री तर तिसरा डॉ. नंदादीप चोडणकर एमडी आहे. ते रोज सकाळी किमान एक तास योग व प्राणायाम करतात. सावंतवाडीत आल्यावर नियमितपणे नरेंद्र उद्यानावर देखील चालायला जातात. आता काही प्रमाणात शरीर साथ देत नसले तरीही ९६ वर्षांचा हा तरुण आपण नक्की शंभरी पार करणार असा विश्वास खंबीरपणे व्यक्त करतो. इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि गुरुच्या सहकार्याने कोणतीही गोष्ट साध्य करता येते त्यामुळे आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्या व शतायुषी व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.