तिलारी धरणातून पुन्हा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग l सुहास देसाई : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण १००% भरण्याच्या मार्गावर असल्याने, धरणातून कोणत्याही क्षणी नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग (Discharge of water) सुरू होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात न उतरण्याचे आणि अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

तिलारी शिर्षकामे उपविभाग क्र. २ चे उपविभागीय अधिकारी ग.दि. बुचडे यांनी जाहीर निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

 

तिलारी धरण

पाणी पातळीत मोठी वाढ

 

२७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. धरणाची पाणी पातळी ११२.४५ मी. होती, जी आज (२९ सप्टेंबर) सकाळी ८.०० वा. ११२.८२ मी. इतकी झाली आहे.

सद्यस्थिती: धरण सध्या ९८.७६% भरले असून, पाणीसाठा ४४१.८०४ द.ल.घ.मी. इतका आहे. गेल्या दोन दिवसांत पाणीसाठ्यात ५.८१२ द.ल.घ.मी. इतकी वाढ झाली आहे.

सुरुवातीचे नियोजन: धरणाच्या ROS (Rule Operating Schedule) व GOS (Gate Opening Schedule) नुसार धरण १९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १००% भरण्याचे नियोजन होते.

 

तात्काळ विसर्गाची शक्यता

 

 

पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे हे नियोजन बदलले असून, धरण येत्या दोन दिवसांतच १००% भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खळग्यातील दगडी धरणाचे गेट्स पुन्हा उघडून पुढील १२ तासांत कधीही अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले जाण्याची शक्यता आहे.

इतर पाण्याचा प्रवाह तसेच, तेरवणमेढे उन्नेई बंधाऱ्यातील पाणीही खरारी नाल्यामार्फत तिलारी नदीपात्रात येत असल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

उपविभागीय अधिकारी ग.दि. बुचडे यांनी नदीकाठच्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्कता बाळगण्याची विनंती केली आहे

नदीपात्रात प्रवेश करू नये येत्या १२ तासांत नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकत असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये.

रात्रीच्या वेळी ये-जा नको,रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदी पात्रातून ये-जा करणे पूर्णपणे टाळावे.

महिला व शेतकरी यांनी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, तसेच नदी पात्रात गुरांना पाणी सोडणारे शेतकरी यांनी विशेष काळजी घ्यावी.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून जलसंपदा विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.