शिक्षणमहर्षी संतोषभाई मेहता यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाआरोग्य शिबीर व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

दापोली (विशेष प्रतिनिधी) – शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे शिक्षणमहर्षी स्व. संतोषभाई मेहता यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. संतोषभाई यांच्या स्मरणार्थ तसेच ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली या प्रशालेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी गिम्हवणे येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह मोफत शस्त्रक्रियेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. गिम्हवणे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत संतोषभाई मेहता सभागृह, राधाकृष्ण मंदिर दापोली येथे करिअर गाईडन्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत इ. ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी श्री उत्तेजक ट्रस्ट पुणे यांचे सहकार्य लाभले असून पुणे येथील प्रा. बी. एल. जोशी व हुजूरपागा सिनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. रुपाली शेठ मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये समाजहिताचे कार्य घडवून आणले जात असून, संतोषभाई मेहता यांच्या कार्याला साजेसे असे हे स्मरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले आहे.