खेड (प्रतिनिधी) :
खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल व उपविभागीय कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर २०२५ रोजी रोटरी स्कूलमध्ये माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, प्रशासनात शिस्त निर्माण करणे, शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन करण्यासाठी माहितीचा अधिकार हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. शासन कार्यपद्धतीबद्दल जनतेत साशंकता निर्माण होऊ नये आणि सर्व शासकीय कामे विनाविलंब पार पडावीत या उद्देशाने रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना या कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणारा प्रभावी उपाय आहे. यामुळे नागरिक प्रशासनाशी थेट संवाद साधू शकतात आणि सामाजिक तसेच आर्थिक न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. प्रत्येक नागरिकाने या अधिकाराची जाणीव ठेवून त्याचा योग्य वापर केल्यास सक्षम आणि समृद्ध समाजाची निर्मिती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दिनाचे औचित्य साधून शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात कु. सृष्टी दिनेश राणे व कु. अनन्या निलेश दोंदे यांनी प्रथम क्रमांक, कु. अंतरा शैलेश भंडारे व कु. अर्णव स्वप्नील परकाळे यांनी द्वितीय क्रमांक, तर कु. कोमल संतोष कासार व कु. गौरी नितीन जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय खेडचे नायब तहसिलदार मा. श्री. अजय पंडीत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी स्कूलचे उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री. राहूल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख श्रीम. तेजश्री कानडे तसेच पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रीतम वडके उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, शाळेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेतील जबाबदारी आणि पारदर्शकतेचे भान देणे हेच असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.











