संयुक्त मानापमानाच्या रंगभूमीवर चमकलेला ‘अजिंक्य’

६,७ रोजी जिल्ह्यात प्रयोग

गौरव पोंक्षे | माखजन

१९२१ साली मराठी रंगभूमीवर गाजलेल्या संयुक्त मानापमानाची या नाटकाची कथा रसिकांना सांगणाऱ्या गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाट्य प्रयोगातून सध्या अजिंक्य पोंक्षे,गायक नट म्हणून रसिकांच्या मनात घर करून बसला आहे.अजिंक्य दीपक पोंक्षे हा संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचा आहे,या नाटकाचे प्रयोग खुद्द चिपळूण,रत्नागिरी या ठिकाणी होत असल्याने जिल्ह्यातून पुढे आलेल्या या कलाकाराचा अविष्कार रसिकांना जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे.

१९२१ पूर्वी संगीत मानापमान हे नाटक बालगंधर्व,व केशवरावं भोसले स्वतः आपापल्या कंपन्यांतर्फे स्वतंत्र प्रयोग करत असत.१९२१ साली महात्मा गांधीजी नी टिळकांच्या मृत्यू पश्चात ‘टिळक स्वराज्य फंडाची’ घोषणा केली.यावेळी टिळक स्वराज्य फंडासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केशवराव भोसले व बालगंधर्व यांची भेट घेतली.व फंड निर्मिती साठी केशवरावं भोसले व बालगंधर्व यांनी पुढाकार घेत संगीत मानापमान हे नाटक संयुक्त रित्या करण्याचे ठरवले.नंतर याचं संगीत नाटकाचे नामकरण झाले..’संयुक्त मानापमान’

या संयुक्त मानापमानाचा पहिला प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी झाला.त्यावेळी सर्वसाधारण नाटकांच्या तिकिटाचा दर होता १₹,२₹,३₹ पण संगीत मानापमानाचा तिकीट दर होता तब्ब्ल १००₹..हो खरंच !त्यावेळी सोन केवळ १५₹ तोळा..आणि पहिल्याच प्रयोगाला १६ हजार ८०० रुपये उत्पन्न मिळालं.मराठी रंगभूमीवरील या नाटकाने जणू इतिहासच रचला.त्याकाळात मराठी रंगभूमीवर अनभिशिक्त अधिराज्य गाजवलेल्या दोन मंडळींनी संगीत मानापमान या नाटकात एकत्र काम केल्यानेच या नाटकाचे संयुक्त मानापमान नामकरण झाले.

१९२१ साली’ संगीत मानापमान’ ते संगीत संयुक्त मानापमान हा प्रवास कसा झाला.याचीच कथा सांगणारे नाटक म्हणजे संगीत ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लेखक अभिराम भडकमकर व दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी १९२१ सालचा प्रसंग या नाटकात उभा केला आहे.आजही ही रंजक कथा पाहायला रसिक गर्दी करतात.

या नाटकाचे जिल्ह्याच्या दृष्टीने विशेष म्हणजे,भामिनी ची भूमिका वठवणारा गायक नट संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील आहे.गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकात अजिंक्य हा पहिल्या दोन अंकात सूत्रधाराची भूमिका करत आहे.तर पुढे भामिनी ची भूमिका करत आहे.जी भूमिका संयुक्त मानापमानात प्रत्यक्ष बालगंधर्वांनी केली होती.

अजिंक्य हा अगदी लहान वयापासून गाणे शिकत आहे.वडील दीपक पोंक्षे हे उत्तम गायक ,भजनी कलावंत असल्याने त्यांचाच वारसा,तो पुढे चालवत आहे.त्याचा भाऊ संदेश पोंक्षे यांना देखील संगीतातील उत्तम माहिती आहे.

अजिंक्य हा माखजन इंग्लिश स्कूल माखजन चा विद्यार्थी असून अगदी लहान पणापासून आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायणाच्या रथसप्तमी उत्सवात ‘रंगल्या रात्री अशा’ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत आला आहे.आरवली येथील आदित्य नारायण मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम व आरवलीतील सांगितिक परंपरा त्याचे संस्कार बिंदू ठरले आहेत.

अजिंक्य चे शास्त्रीय संगीतातील शिक्षण कविता गाडगीळ,श्री सतीश कुंटे यांचे कडे तर पुढील शिक्षण श्री प्रसाद गुळवणी यांचेकडे सुरु आहे.नाट्य संगीतातील धडे तो श्री विलास हर्षे,श्री मकरंद कुंडले यांच्या कडे सुरु आहे.

अजिंक्य पोंक्षे चे हे खर तर पहिलच व्यवसायिक रंगभूमीवरील नाटक आहे.आणि पहिल्याच नाटकाने त्याला ब्रेक दिला अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.रत्नागिरीतील सुपरिचित अशा खल्वायन संस्थेतर्फे मनोहर जोशी व श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हौशी रंगमंचावर अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत.अनेक भूमिकांसाठी त्याने राज्यस्तरावर रौप्य पदक ही पटकावली आहेत.संगीत सौभद्र,संगीत ताजमहाल,हे बंध रेश्माचे,ययाति देवयानी अशा अनेक नाटकात उल्लेखनीय काम करु नाव कमावले आहे.

चतुरंग प्रतिष्ठान तर्फे ६ रोजी चिपळूणात तर ७ रोजी रत्नागिरीत प्रयोग होत असल्याने. संयुक्त मानापमानाची १९२१ साली घडलेली गोष्ट अनुभवता येणार आहे.व भामिनी हे स्त्री पात्र साकरणाऱ्या अजिंक्य पोंक्षेला अनुभवता येणार आहे.