बुरुड समाजाच्या साथीने शिवसेना अधिक बळकट..!

दापोली (प्रतिनिधी) :
दापोली तालुक्यातील काळकाई कोंड येथे बुरुड समाजाचा भव्य मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा ३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १५० वर्षांची परंपरा असलेल्या या समाजाने आज एकजुटीने शिवसेनेत प्रवेश करून पक्षावर आपला विश्वास दर्शविला. हा कार्यक्रम मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी बोलताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, “मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध आहे. बुरुड समाजाने मला दिलेली भेट ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. हा सन्मान माझ्या नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या आपुलकीचा प्रतीक आहे.”
मंत्री कदम यांनी पुढे सांगितले की, नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून महिलांना सक्षम बनविणाऱ्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ बुरुड समाजालाही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“आपल्या मतदारसंघातील ४७ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल. विकासाला प्राधान्य देणे हीच माझी शिकवण आहे. माझं राज्यमंत्री पद हे माझं नाही, तर आपल्या सर्वांच्या प्रतिनिधित्वाचं प्रतीक आहे,” असेही कदम यांनी सांगितले. या प्रसंगी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी समाजाच्या एकजुटीचे आणि शिवसेनेवरील विश्वासाचे कौतुक केले. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, शहर प्रमुख प्रसाद रेडेकर, उपनगराध्यक्ष खालिफ भाई रखांगे, सचिन धाडवे, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
बुरुड समाजाचे अध्यक्ष प्रकाश सपकाळ, खजिनदार दिलीप सावंत, सचिव अभिजित महाडकर, सल्लागार रवी सोंडकर, महिला अध्यक्ष पूर्वा माने, सचिव अक्षरा महाडकर यांच्यासह समाजबांधवांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला. या मेळाव्याला समाजबांधव, पदाधिकारी, नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. एकात्मता, विकास आणि शिवसेनेवरील विश्वासाचे दर्शन या मेळाव्यात स्पष्टपणे दिसून आले.