महिलांचे आरोग्य निरोगी तरच देश सक्षम

साळशी येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ

शिरगाव (प्रतिनिधी)    महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने देवगड तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत साळशी आरोग्य उपकेंद्रात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय पोषण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

राष्ट्राच्या आरोग्यदृष्टीकोनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार आणि पोषण यावर शासनाने विशेष भर दिला आहे. त्याच अनुषंगाने साळशी येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी, आभा कार्ड व पी.एम.-जय कार्ड नोंदणी, एन.सी.डी. स्क्रिनिंग, गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, समुपदेशन व एम.सी.पी. कार्ड वाटप करण्यात आले.

याशिवाय समतोल आहार प्रदर्शन, संशयित क्षयरुग्णांची थुंकी तपासणी, फिजिओथेरपी मार्गदर्शन, एच.एल.एल. लॅब मार्फत रक्त तपासण्या आणि मोफत किरकोळ औषधांचे वाटप असे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.

या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी पल्लवी मुंडे, आरोग्य सहायिका रूपाली लाड, आरोग्य सेवक सतीश म्हाडदळेकर, गटप्रवर्तिका अर्पिता फाटक, मदतनीस प्रतिभा पोईपकर, आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे, अंगणवाडी सेविका मनीषा नाईक, प्रतीक्षा शिवलकर, मदतनीस रसिका मिराशी, सुविधा किंजवडेकर आदी उपस्थित होते.

या उपक्रमात साळशी चाफेड येथील अनेक महिला व जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.