महिलांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करून नेतृत्व करावे: विद्या तावडे

सावंतवाडी । प्रतिनिधी : महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते तसेच त्या समाजाचेही नेतृत्व करू शकतात. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन चंदगड येथील दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे यांनी केले.

सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी आणि डॉन बॉस्को संचलित कोकण डेव्हलपमेंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नवसरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकास कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

कार्यशाळेचा उद्देश आणि मार्गदर्शन

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग डेव्हलपमेंट सोसायटीचे समन्वयक राजेंद्र कांबळे, सावंतवाडीच्या सीएसओ रेवती वालावलकर, आणि मैत्री परुळेकर आदी उपस्थित होत्या.

राजेंद्र कांबळे यांनी उपस्थितांना महिला नेतृत्वाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, या कार्यशाळेतून महिलांना आत्मविश्वास, निर्णय क्षमता, सामाजिक भान, आणि नेतृत्व गुण विकसित करण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे. तसेच महिलांचे नेतृत्व समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली प्रभावी साधन असून अशा कार्यशाळेमधून गावोगावी महिलांचे सक्षम नेतृत्व घडणार आहे.

घावनळे येथील सरपंचांनी महिला सक्षमीकरणासाठी अशा महिला नेतृत्व विकास कार्यशाळांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, तसेच या कार्यशाळेमधून वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने निडर नेतृत्व तसेच वक्तृत्व घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी, कोकण डेव्हलपमेंट संस्था आणि डॉन बॉस्को यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रशिक्षणाचे नियोजन

या कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या महिलांच्या विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना ग्रामविकास, आर्थिक नियोजन, नेतृत्व कौशल्ये, आणि कायदेविषयक माहिती यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, या प्रशिक्षणामध्ये युवक आणि युवती यांनाही वेगवेगळे शिक्षण देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटीच्या सीएसओ रेवती वालावलकर यांनी या संपूर्ण कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केले. उपस्थितांचे आभार मैत्री परुळेकर यांनी मानले.