सावंतवाडी । प्रतिनिधी : सध्या संपूर्ण राज्यभर सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा पंधरवड्या’च्या अनुषंगाने, स्वच्छता ही सेवा या घटकाखाली ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाची सावंतवाडी तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या महत्त्वाकांक्षी अभियानाचा तालुकास्तरीय प्रारंभ मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मळेवाड माळकरटेंब येथे करण्यात आला. सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अनिल नाईक यांच्या घराशेजारील परसबागेत शोषखड्डा खोदाई करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वच्छता, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण अशा विविध घटकांना बळ देणाऱ्या या अभियानामुळे गावातील सांडपाण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांची अंमलबजावणी वेगाने सुरू झाली आहे.
यावेळी शुभारंभप्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, मधुकर जाधव, रोजगार सेवक अमित नाईक, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, वैभव मोरुडकर, अंगणवाडी सेविका, सी.आर.पी., ग्रामस्थ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













