धरणात पोहताना सर्पदंश होऊन एकाचा मृत्यू

 

चिपळूण : कळवंडे धरणावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई घाटकोपर येथील एका व्यक्तीला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संजय तुकाराम कापरट (४६) घाटकोपर, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

ही घटना ९ जुलै रोजी घडली. मुंबई घाटकोपर येथून पाच मित्र दोन दिवसांपूर्वी पावसाळी सहलीसाठी संगमेश्वर परिसरातील आपल्या गावी आले. तेथे फिरुन रविवारी ते चिपळूण तालुक्यातील कळंवडे येथील धरणावर पोहण्यासाठी आले.

दुपारी ३ वा. ते कळवंडे धरणावर पोहण्यासाठी उतरले. याच वेळी संजय याला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला.

सुरुवातीला ते त्याला समजले नाही. त्यानंतर त्याच्या अंगात विष चढू लागल्याने तो अस्वस्थ झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला डेरवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. तीनवेळा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.