उपाध्यक्ष प्रकाश लोळगे यांची बिनविरोध निवड
राजापूर | वार्ताहर : मागील सहा वर्षे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्षपद भूषविताना पतसंस्थेची संस्थेची प्रगती साधण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावत पुन्हा सहकार पॅनेलच्या माध्यमातुन संस्थेवर वर्चस्व प्रस्थापीत करणाऱ्या प्रकाश मांडवकर यांची पुन्हा एकदा पतपेढीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रथमच संचालक म्हणून निवडून आलेले शहरातील आंबेवाडी येथील रहिवाशी प्रकाश उर्फ भाऊ लोळगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या संचालक पदाची निवडणुक नुकतीच पार पडली होती. बुधवारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी बहुमताने श्री. मांडवकर व श्री. लोळगे यांच्या नावावर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी बाळकृष्ण तांबे, अविनाश नवाळे, रमेश सुद, सुरेश ऐनारकर, विद्याधर गोठणकर, सोनू तिर्लोटकर, स्वप्नील खटावकर, सौ. मानसी दिवटे, सौ. अमृता शिवगण, धनेश कोकरे, अनंत मोरवस्कर आदी नवनिर्वाचित संचालक, पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव आदींसह कर्मचारी वृंद उपस्थीत होता.
या निवडीनंतर निवडणुक अधिकारी श्री. कांबळे, उपस्थीत संचालक, तसेच सहकार पॅनेलचे प्रकाश कुवळेकर, रामचंद्र सरवणकर, दिपक नागले, सुधीर तांबे, संदीप पुजारी, श्रीकांत सोडये, अड. एस. एम. देसाई, सतिश बंडबे, अधिकारी व कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट, समाज बांधव यांनी श्री. मांडवकर, व श्री. लोळगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी भविष्यात पतसंस्थेची स्वत:ची अत्याधुनिक सुविधांयुक्त वास्तु उभी करणे, पतसंस्थेची गुणात्मक वाढ करणे, कार्यक्षेत्राचा विस्तार करताना सभासदांना अधिकाधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे श्री. मांडवकर यांनी सांगितले.
काही अपरिहार्य कारणास्त पतसंस्थेची निवडणुक झाली असली तरी सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळात पतपेढीची वाटचाल करण्याचा मनोदय श्री. मांडवकर यांनी व्यक्त केला. पतसंस्थेने निर्माण केलेल्या शाखांची गुणात्मक दृष्टया प्रगती साधणे आणि पतसंस्थेला सर्वांगणाने प्राप्त झालेला दर्जा टीकवून ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेवून पुढची वाटचाल करणार असल्याचे मांडवकर यांनी सांगितले. पतसंस्थेच्या संदर्भात कोणाच्याही मनात असलेल्या सूचना शंका त्यांनी योग्य व्यासपीठावर मांडाव्यात त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव केला जाणार नाही. ज्या समाज धुरीणांनी ज्या उद्देशाने ही पतसंस्था सुरू केली त्यांच्या हेतुला यतकिंचीतही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही सर्व मंडळी पुढच्या काळात घेवू अशी ग्वाही श्री. मांडवकर व श्री. लोळगे यांनी दिली.