नारिंग्रे ग्रामस्थांची एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी; दोन दिवसांत दहीबाव–बागमळा मार्ग सुरू होणार

देवगड (प्रतिनिधी)
नारिंग्रे ग्रामस्थांनी सरपंच महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड आगारात भेट देऊन बंद असलेल्या एसटी वाहतुकीसंदर्भात आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्याशी चर्चा केली. सध्या एसटी वाहतूक बंद असल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मिठबांव पुलमार्गे हिंदळे मार्गे नारिंग्रे कॅन्टीनपर्यंत तातडीने एसटी फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरील मोरीच्या कामामुळे दहीबाव–बागमळा मार्गावर बससेवा बंद आहे. हे काम गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होत असल्याने या मार्गावरील बसफेऱ्या शुक्रवारपासून नियमित सुरू होतील, असे आश्वासन आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच इतर बंद असलेल्या फेऱ्या पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्याबाबत विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वागदेवाडी–देवगड, सडेवाडी–देवगड, मालवण–देवगड (१.३०), देवगड–कणकवली (१०.२०), देवगड–मालवण (७.४५), देवगड–मोर्वे (१२), देवगड–आचरा (१.३०) आणि देवगड–वागदेवाडी (६.१०) या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी आग्रह धरला.

या भेटीप्रसंगी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सरपंच महेश राणे, नारायण घाडी, राजेंद्र घाडी, स्वप्नील गावकर, प्रकाश राणे, संजय भावे, देवांग राणे आणि आदित्य शिंदे उपस्थित होते.