रत्नागिरी ः प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या या विशेष अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि समुपदेशन सेवा पुरविण्यात आल्या.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण व शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे हे होते. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी आरोग्य संस्थांच्या समन्वयातून ३८३९ शिबिरे आयोजित करण्यात आली. या सर्व शिबिरांमधून २ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
महत्त्वाची तपासणी आकडेवारी:
या शिबिरांमध्ये अनेक महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये उच्च रक्तदाबाची २८,३०२, तर मधुमेहाची ३०,९८५ व्यक्तींची तपासणी झाली. तसेच, १४,७७७ व्यक्तींची कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय मुख) तपासणी करण्यात आली. विशेषतः महिला आणि पुरुषांसह एकूण ४३,२७६ व्यक्तींची रक्तक्षय (Anemia) तपासणी झाली. याव्यतिरिक्त, गर्भवती महिलांची (ANC) ४२१४ तपासणी, १६,१२९ किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण विषयक समुपदेशन, आणि २५,९३१ व्यक्तींची क्षयरोग तपासणी करण्यात आली.
यासोबतच ४,८४१ बालकांना लसीकरण सेवा, ३९,२४२ नागरिकांना आयुष्मान भारत / वय वंदन कार्डचे वाटप तसेच ७१५ रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत, स्थानिक संस्था आणि विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी केली. महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढवून, आजारांचे लवकर निदान करून कुटुंबांचे आरोग्य बळकट करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू साध्य झाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.












